प्रतिनिधी : स्वाती गायकवाड
वाशिम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात पर्यवेक्षीय अधिकारी म्हणून शैक्षणिक गुणवत्ता विकासाचे काम करणाऱ्या 'महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ, महाराष्ट्र' या संघटनेच्या वाशीम जिल्हाध्यक्षपदी विनोद बबनराव झनक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राज्याध्यक्ष अशोकराव महाले यांनी अधिकृत पत्राद्वारे ही निवड जाहीर केली.विनोद झनक हे सध्या तोंडगाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी साखरा येथील जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळेत 'आयडॉल शिक्षक' म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालय प्रवेशासाठी पात्र ठरविले आहे.एक कर्तव्यदक्ष, जिज्ञासू आणि अभ्यासू शिक्षक म्हणून शिक्षण क्षेत्रात त्यांची मोठी ओळख आहे. केंद्रप्रमुख म्हणून काम करतानाही सर्वांना सोबत घेऊन जबाबदारी पार पाडण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्या याच संघटनात्मक आणि शैक्षणिक गुणांची दखल घेत संघटनेने त्यांच्यावर ही नवीन जबाबदारी सोपवली आहे.विनोद झनक यांच्या या निवडीबद्दल जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातून, शिक्षक आणि केंद्रप्रमुख बांधवांकडून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.
