कोटपा २००३' कायदा आणि तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत विद्यार्थ्यांना करण्यात आले जनजागृती.
वाशिम:
तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी जाणाऱ्या तरुण पिढीला वाचवण्यासाठी आणि शालेय स्तरावरच जनजागृती निर्माण करण्यासाठी जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय वाशिम अंतर्गत आज मंगळवार, दिनांक १४ जुलै २०२६ रोजी तंबाखू नियंत्रण मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा (वाळकी), जि. प. प्राथमिक शाळा (दोडकी) आणि जि. प. प्राथमिक शाळा (गिव्हा) येथे हा शालेय तंबाखू नियंत्रण मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल कावरखे,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश पुरी आणि बाह्य संपर्क वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार डॉ.आदित्य पांढरकर यांनी विद्यार्थ्यांना चित्रांच्या माध्यमातून आरोग्यावरील दुष्परिणामांचे सादरीकरण,तंबाखूजन्य पदार्थांमुळे शरीरावर होणाऱ्या शारीरिक व मानसिक परिणामांची सविस्तर माहिती दिली. तंबाखूमध्ये असणारे घातक रासायनिक पदार्थ, त्यामुळे होणारा मुखाचा कर्करोग (कॅन्सर), त्याची प्राथमिक लक्षणे आणि घ्यावयाची खबरदारी याबद्दल त्यांनी चित्रांच्या व तक्त्यांच्या माध्यमातून अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.
'कोटपा कायद्या'बाबत दिली माहिती
सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण धाडवे यांनी 'तंबाखू मुक्त शाळा' या संकल्पनेवर प्रकाश टाकला. तसेच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा म्हणजेच 'कोटपा २००३' (COTPA 2003) अंतर्गत असणाऱ्या नियमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तंबाखूच्या व्यसनातून मुक्ती मिळवण्यासाठी शासनाचा मोफत टोल फ्री क्रमांक १८००११२३५६ यावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना जनजागृतीपर माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे
मुख्याध्यापक,सहाय्यक शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. शाळेच्या परिसराला तंबाखूमुक्त ठेवण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला.

