रिसोड, प्रतिनिधी :
रिसोड येथील श्री रामेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मोठेगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती व मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात मानसशास्त्रज्ञ राम सरकटे यांनी तंबाखू, गुटखा, सिगारेट तसेच इतर व्यसनांच्या सेवनामुळे होणारे तोंडाचा कर्करोग, घशाचा कर्करोग आणि इतर गंभीर आरोग्यविषयक दुष्परिणाम याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. "व्यसनमुक्ती हाच खरा विकास आहे," असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यानंतर सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण धाडवे यांनी तंबाखूमुक्त शाळा, तंबाखू नियंत्रण कायदा (कोटपा-2003) तसेच व्यसनामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन केले.
जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाचे मनोविकृती सामाजिक कार्यकर्ते सुनील सुर्वे यांनी तणाव, नैराश्य आणि व्यसन यांतील परस्परसंबंध स्पष्ट करत सकारात्मक विचार, योग, समुपदेशन आणि मानसिक आरोग्य जपण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. खंडारे सर होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे तसेच निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. ढोणे सर यांनी केले. यावेळी विद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
