Top News

वरुणदेवता शेवटी आली बरसून, पण शासनाचे अधिकारी आले नाही पंचनाम्यास धावून.


वाशीम प्रतिनिधी : तब्बल महिनाभराच्या विश्रांतीनंतर वाशीम जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वाशीम, मालेगाव, रिसोडसह जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावल्याने सुकत चाललेल्या खरीप पिकांना मोठा आधार मिळाला असून, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काही प्रमाणात समाधान दिसून येत आहे.
गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग यांसह विविध खरीप पिकांवर पाण्याअभावी संकट ओढवले होते. अनेक ठिकाणी पिके कोमेजून गेल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत झालेल्या दमदार पावसामुळे विशेषतः सोयाबीन पिकाला दिलासा मिळाला आहे.
मात्र, पावसाच्या या हजेरीने संपूर्ण संकट दूर झालेले नाही. शेतकरी संघटनांच्या मते, जिल्ह्यातील जवळपास ५० टक्के खरीप पिकांचे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, परतीच्या पावसामुळे सध्या पिकांना तात्पुरते जीवनदान मिळाले असले तरी जिल्ह्यातील अनेक प्रकल्प अद्यापही पुरेशा पाणीसाठ्यापासून दूर आहेत. आगामी काळात समाधानकारक पाऊस न झाल्यास रब्बी हंगामावरही त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून, भविष्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण होऊ शकते.
त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या पावसामुळे दिलासा मिळाला असला तरी आणखी दमदार आणि समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. वरुणदेवतेने उशिरा का होईना हजेरी लावली; मात्र आधी झालेल्या नुकसानीचे पंचनामे आणि मदतीसाठी प्रशासनाची प्रत्यक्ष धावपळ कधी सुरू होणार, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने