राजगाव व्यसनमुक्ती केंद्रात एचआयव्ही रक्त तपासणी शिबिर; रुग्णांना जनजागृतीसह समुपदेशन.


वाशिम, दि. ८ जुलै :
 महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम आणि ज्योतिबा फुले सेवा ट्रस्ट, नांदेड संचलित व्यसनमुक्ती केंद्र, राजगाव यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती केंद्र, राजगाव येथे एचआयव्ही रक्त तपासणी व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांच्या मार्गदर्शनाखाली ७ जुलै २०२६ रोजी आयोजित या शिबिरात रुग्णांची एचआयव्ही रक्त तपासणी करण्यात आली. यावेळी समुपदेशक (FCTC) श्री. विनोद रत्नपारखी यांनी एचआयव्ही संदर्भातील गैरसमज दूर करत आजाराचा प्रसार होण्याचे चार प्रमुख मार्ग आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबत सविस्तर माहिती दिली.
तसेच समुपदेशक (DSRC) श्री. मिलिंद घुगे यांनी गुप्तरोग, त्याचे गंभीर परिणाम, वेळेवर निदान आणि उपचाराचे महत्त्व याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Tech) श्रीमती करुणा आरू यांनी लाभार्थ्यांची एचआयव्ही रक्त तपासणी केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुधीर गावंडे यांनी केले, तर श्री. दिनेश गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी व्यसनमुक्ती केंद्रातील कर्मचारी विठ्ठल सांगळे, महेश गोटे, श्रीमती मीरा प्रजापती, उमेश भालेराव तसेच केंद्रातील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने