Ad Code

पोस्टमनच्या जिद्दीची कहाणी.

किसन कांबळे यांच्या तिन्ही पाल्यांनी घडवला यशाचा इतिहास – तिन्ही मुलं झाले शासकीय अधिकारी.

व्यक्तीवेध विशेष 

तांदळी शेवई येथील पोस्टमन किसन नारायण कांबळे यांच्या कुटुंबाने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर अभूतपूर्व यश संपादन करत इतिहास घडवला आहे. त्यांच्या तिन्ही पाल्यांनी शासकीय सेवेत अधिकारी पद मिळवत समाजासाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

किसन कांबळे यांना लवकरच पोस्टमनची नोकरी लागल्यामुळे त्यांना पुढील शिक्षण घेता आले नाही. मात्र, “आपण नाही शिकलो तरी आपल्या मुलांना अधिकारी बनवायचे” हे स्वप्न त्यांनी मनाशी बाळगले होते. कमी पगार आणि जास्त काम असलेल्या पोस्टमनच्या नोकरीसोबतच शेती व छोट्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी कुटुंबाची जबाबदारी पार पाडली आणि मुलांच्या शिक्षणात कोणतीही कमतरता भासू दिली नाही.

त्यांच्या कुटुंबात मोठी मुलगी कामिनी कांबळे, मुलगा गजानन कांबळे आणि सर्वात लहान ज्ञानेश्वर कांबळे आहेत. लहानपणापासूनच तिन्ही भावंडांनी आई-वडिलांना मदत करत शिक्षण घेतले. त्यांनी न्यूज पेपर एजन्सी, पीठ गिरणी व किराणा दुकान चालवत वडिलांना हातभार लावला.

कामिनी कांबळे यांचा प्रवास

कामिनी कांबळे यांनी बारावी सायन्स पूर्ण करून ANM डिप्लोमा केला. मात्र शासकीय सेवेत जाण्याच्या उद्देशाने त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. काही काळ शिक्षक म्हणून काम करत त्यांनी अभ्यास सुरू ठेवला. बुलढाणा जिल्हा परिषदेत काही गुणांनी संधी हुकली, पण त्यांनी हार न मानता प्रयत्न सुरू ठेवले आणि अखेर 2016 मध्ये जिल्हा परिषद वाशिम येथे आरोग्य सेविका म्हणून निवड झाली.

गजानन कांबळे यांचा प्रवास

गजानन कांबळे यांनी B.Sc. Nursing पूर्ण करून स्पर्धा परीक्षेची तयारी केली. सुरुवातीला जळगाव येथे समुदाय विकास अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतरही त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले आणि DMER तसेच DHS मध्ये Nursing Officer पद मिळवले. अखेरीस त्यांनी वाशिम येथे सेवा देण्याचा निर्णय घेतला.

 ज्ञानेश्वर कांबळे यांचा संघर्ष

ज्ञानेश्वर कांबळे यांनी बारावी सायन्स बी.ए. एम. ए. इंग्रजी आर ए कॉलेज वाशीम येथे पूर्ण केले. सुरुवातीला MPSC ची तयारी केली, मात्र यश न मिळाल्याने त्यांनी बँकिंग क्षेत्राकडे वळण घेतले. कोरोना काळात ऑनलाइन अभ्यास करत त्यांनी सातत्य ठेवले. संभाजीनगर येथे जाऊन दोन वर्षे कठोर मेहनत घेतली.

त्यांनी ICICI Bank मध्ये Executive Manager पद, SBI मध्ये लिपिक पद, तसेच United India Insurance Company मध्ये Administrative Officer (Grade-1) पदाची परीक्षा उत्तीर्ण केली. त्याचबरोबर राज्य शासनाच्या आदिवासी विभागात वरिष्ठ लिपिक व वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक पदाची परीक्षा देखील उत्तीर्ण केली. अखेरीस त्यांनी पांढरकवडा येथे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक म्हणून रुजू होण्याचा निर्णय घेतला.

प्रेरणादायी संदेश

सलग अपयश, संघर्ष आणि मेहनतीनंतर मिळवलेले हे यश सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. “जिद्द आणि सातत्य असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही” हे या कुटुंबाने सिद्ध करून दाखवले आहे.

या यशाचे श्रेय तिन्ही भावंडांनी आपले वडील किसन नारायण कांबळे आणि आई लक्ष्मी कांबळे यांना दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या