प्रतिनिधी मानोरा: सामर्थ्यशाली विचार आणि मानवतेची शिकवण देणारे थोर क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मानोरा तालुक्यातील पिंपरी हनुमान येथे उत्साहात पार पडला. १५ फेब्रुवारी रोजी मुख्य जन्मोत्सवानिमित्त पहाटेपासूनच पिंपरी हनुमान गावातील प्रत्येक घरात उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले.
गावात काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेमध्ये पिंपरी हनुमानच्या लेकीनी डोक्यावर कलश घेऊन आणि पारंपरिक गीतांच्या तालावर नृत्य करून परिसराचे लक्ष वेधून घेतले. टाळ-मृदंगाचा गजर आणि तरुणांच्या अंगात संचारलेला उत्साह पाहून जणू भक्तीचा महासागरच रस्त्यावर उतरल्याचा भास होत होता. गावकऱ्यांनी स्वयंप्रेरणेने ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत केले, ज्यामुळे उत्सवाची रंगत द्विगुणित झाली.
पारंपरिक बंजारा पेहरावातील महिला , पुरुष आणि तरुण मंडळी भजनाच्या तालावर आणि टाळ-मृदंगाच्या गजरात या मिरवणुकीत तल्लीन होते. या मिरवणुकीतून संत सेवालाल महाराजांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संत सेवालाल महाराज जन्मोत्सव उत्सव समितीने परिश्रम घेतले.

Facebook
0 Comments