Ad Code

#सहजच.. #मराठी भाषा गौरव दिन.. #माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।

 


"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी" या कुसुमाग्रजांच्या ओळींना स्मरून आपण दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करत असतो. २७ फेब्रुवारी, म्हणजेच ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ 'कुसुमाग्रज' यांचा जन्मदिवस. त्यांच्या साहित्यातील योगदानाबद्दल कृतज्ञता म्हणून हा दिवस आपण साजरा करतो.

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपला श्वास आणि स्वाभिमान आहे. ही तीच भाषा आहे जिने ज्ञानेश्वरांच्या 'ज्ञानेश्वरी'तून अमृताचा अनुभव दिला आणि तुकोबांच्या गाथेतून भक्तीचा मार्ग दाखवला. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या भाषेतून स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरवले, ती ही वीरश्रीमंत मराठी भाषा आहे.

आपण एकीकडे मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो तर दुसरीकडे मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत आहेत. ही एक अत्यंत दाहक आणि विचार करायला लावणारी वस्तुस्थिती आहे. 

आपण वर्षातून एकदा 'गौरव दिन' साजरा करून भाषेचे कौतुक करतो, परंतु वर्षभर भाषेचा पाया असलेल्या मराठी शाळांच्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष करतो. इंग्रजी हीच प्रगतीची भाषा आहे, या गैरसमजामुळे अनेक मराठी भाषिक पालक आपल्या पाल्यांना मराठी शाळांपासून दूर नेत आहेत. सोयीसुविधांचा अभाव, शिक्षकांची कमतरता आणि अनुदानाचे प्रश्न यामुळे मराठी शाळांचे व्यवस्थापन खिळखिळे झाले आहे.

शिक्षणाचे व्यापारीकरण झाल्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पीक आले आहे, परिणामी 'ना नफा' तत्त्वावर चालणाऱ्या मराठी शाळा मागे पडत आहेत. भाषेला 'अभिजात दर्जा' मिळणे ही अभिमानाची गोष्ट असली, तरी ती भाषा 'रोजगाराची' आणि 'आधुनिक शिक्षणाची' भाषा झाल्याशिवाय शाळा टिकणे कठीण आहे असे मला वाटते.

मराठी भाषेत जितके प्रेम आहे, तितकीच शब्दांची धारही आहे. आपली मराठी भाषा वाकते पण मोडत नाही. आता आपल्या लाडक्या मराठी भाषेला 'अभिजात भाषेचा' दर्जा मिळाला आहे, जो तिच्या हजारो वर्षांच्या प्राचीन संस्कृतीचा विजय आहे. आजच्या आधुनिक युगात आपण इंग्रजी शिकावे, पण मराठी विसरू नये. आपली भाषा टिकली तरच आपली संस्कृती टिकेल. म्हणूनच, आज आपण प्रतिज्ञा करूया की आपण मराठीत बोलू, मराठीत वाचू आणि मराठीचा अभिमान सदैव बाळगू.

केवळ घोषणा देऊन किंवा भाषणे करून भाषा टिकणार नाही. जर मराठी भाषा खऱ्या अर्थाने जपायची असेल, तर ती व्यवहाराची आणि तंत्रज्ञानाची भाषा होणे गरजेचे आहे. जोपर्यंत आपण आपल्या मुलांना मराठी शाळेत अभिमानाने पाठवणार नाही, तोपर्यंत 'मराठी भाषा गौरव दिन' केवळ एक सोहळाच उरेल.

धन्यवाद! जय हिंद! जय महाराष्ट्र! जय शिवराय! 🚩🙏❤️✨

महादेव एकाडे पाटील

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या