तृतीयपंथीयांच्या जीवनकथेने टाकले अंतर्मुख.
UBN News Network..
नागपूर | शुक्रवार, २० फेब्रुवारी २०२६
तृतीयपंथी समाजाच्या दाहक वास्तवावर आधारित ‘कायांतर’ या कादंबरीचा ग्रंथपरिचय व एकपात्री रंगमंचीय आविष्काराचा कार्यक्रम लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात पार पडला. श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट आयोजित या कार्यक्रमात ज्येष्ठ रंगकर्मी व लेखक डॉ. पराग घोंगे यांनी कादंबरीतील तृतीयपंथीय व्यक्तीचा प्रवास एकपात्री प्रयोगातून सादर केला.
एकपात्री प्रयोग सादर करताना ज्येष्ठ रंगकर्मीं डॉ. पराग घोंगे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संदीप जोशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून लेखिका मनीषा अतुल, वक्ते आशुतोष अडोणी, कादंबरीतील नायिका आंचल वर्मा तसेच कादंबरीच्या लेखिका रश्मी पदवाड-मदनकर उपस्थित होत्या.
मनीषा अतुल यांनी नेटक्या शब्दांत कादंबरीचा आशय उलगडला. आशुतोष अडोणी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात कथेच्या नायिका आंचल वर्मा यांची माफी मागून केली. “परमेश्वराने दिलेल्या वेगळेपणाला समाजाने स्वीकारले नाही, ही चूक आपण पिढ्यान् पिढ्या करत आलो आहोत; पण ‘कायांतर’च्या निमित्ताने ती पुन्हा होणार नाही,” असे त्यांनी नमूद केले. कादंबरी वाचताना तृतीयपंथीयांचे दाहक वास्तव अंतर्बाह्य हादरवून टाकते, असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात आमदार संदीप जोशी म्हणाले, “‘कायांतर’ ही कादंबरी वाचल्यानंतर प्रत्येकातील ‘मी’ गळून पडेल आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. आंचल वर्मा यांच्या संघर्षमय जीवनकथेपुढे आपली दुःखे क्षुल्लक वाटतील.
ही कादंबरी नैराश्यात असणाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.” तसेच तृतीयपंथीय समाजाच्या समस्या लक्षात घेऊन त्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र शौचालयांची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.आंचल वर्मा यांनीही मनोगत व्यक्त केले. एकपात्री प्रयोगाचे दिग्दर्शन रमेश लखमापुरे यांनी केले. संगीत – चारुदत्त जिचकार, नेपथ्य – सतीश काळबांडे, रंगभूषा – लालजी श्रीवास, वेशभूषा – अपर्णा लखमापुरे यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन जयश्री कुलकर्णी-अंबासकर यांनी केले.


Facebook
0 Comments