Ticker

6/recent/ticker-posts 🔥 Breaking News | 🔔 Subscribe Awaj TV10 Marathi

Ad Code

एरंडोल ते धरणगाव महामार्गावरील धुळीने प्रवासी त्रस्त.

वाहणामुळे धूळ उडत असल्याचा फोटो. व रस्त्याची अवस्था.

१२ किलोमीटर मार्गाच्या नूतनीकरणाचे काम कासवगतीने : दोन आठवड्यांपासून काम बंद : जीव मुठीत घेऊन प्रवास.

प्रतिनिधी:- एरंडोल
वि. रा. महाले
19 फेब्रुवारी 2026.

धरणगाव ते एरंडोल या १२ किलोमीटरच्या मार्गाचे नूतनीकरणाचे काम सुरु आहे. परंतु, या रस्त्यावरील

 धूळ तसेच खडी, खड्डे यांचा प्रवाशांसह नागरिकांना त्रास होत आहे. हे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी केली जात आहे.

एरंडोल ते धरणगाव या राज्य महामार्गाच्या रूंदीकरणासह कॉक्रिटीकरणाच्या कामासाठी टोळी गावापासून कमल लॉन्सपर्यंत रस्त्याची एक बाजू खोदण्यात आली आहे. तर रस्त्याचा उरलेला भाग व रूद केलेला कच्चा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, या रस्त्यावर उखडलेली खडी, माती व धुळीचे लोट यांना सामोरे जाऊन सर्व वाहनांची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून या मार्गावर उडणाऱ्या धुळीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

विशेष म्हणजे हा रस्ता एका बाजूला खोदण्याचे काम झाल्यानंतर जवळपास दोन आठवड्यांपासून काम बंद असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, एरंडोल ते धरणगाव या मार्गाची लांबी अवधी १२ किलोमीटर असून या मार्गावर रात्रंदिवस वाहनांची वर्दळ सुरू असते. प्रत्येक वाहन रस्त्यावरुन जातांना धुळीचे लोट उठतात. त्यामुळे वाहतूक करणे कमालीचे धोक्याचे ठरत आहे. या १२ किमी रस्त्यावरून प्रवासासाठी पूर्वी २० मिनिटे लागत. मात्र, आता धुळीचे लोट उठवत प्रत्येक वाहनाला एक तास लागतो. एरंडोल, टोळी, बांभोरी व पंचक्रोशीतील गावांचे शेतकरी रात्री या मार्गाने शेतात ये-जा करतात. त्यामुळे त्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

रस्ता अरुंद असल्याने प्रवास धोकेदायक, प्रवाशांच्या आरोग्याला धोका, वाहनांचे नुकसान, वेळेचा अपव्यय आदी प्रकार सुरू आहेत. तसेच दिवसा धूळ तर रात्री अंधारामुळे प्रवास जीवघेणा ठरतो. रात्री रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात प्रकाश योजना उपलब्ध करून द्यावी, असे सुजाण नागरिकांचे मत आहे.

या रस्त्याच्या एका बाजूने वाहतूक सुरू असून खड्डे, उंचवटे व खडी उडवत वाहने नेताना तारेवरची कसरत करावी लागते. दुचाकी घसरल्याने अनेक अपघात झाले आहेत. रहदारी एका बाजूनेच सुरू असल्याने ठिकठिकाणी वाहनांच्या रांगा लागतात. यामुळे प्रवासी व चालक कमालीचे त्रस्त झाले आहेत. या कच्च्या रस्त्यावर सकाळी, दुपारी व संध्याकाळी टँकरद्वारे पाणी टाकण्याची मागणी होत आहे.

काही दिवस काम बंद अन् कासवगतीने काम यामुळे रस्त्याचे काम लांबणीवर पडले तर अपघाताचे प्रमाण वाढून निष्पाप लोकांना अवयव वा प्राणाला मुकावे लागेल. याला सर्वस्वी जबाबदार ठेकेदार तसेच या कामावर नियंत्रण ठेवणारी शासकीय यंत्रणा राहिल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

📄 अधिकृत PDF डाउनलोड करा

Post a Comment

0 Comments