Top News

पावसाअभावी तिवळी शिवारातील सोयाबीन पीक करपले.

आमदार अमित झनक यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली नुकसानीची पाहणी; पंचनामे करून मदतीची मागणी करण्याचे आश्वासन...

प्रतिनिधी : स्वाती गायकवाड

मालेगाव : तालुक्यातील तिवळी शिवारात पावसाने पाठ फिरवल्याने सोयाबीन पिकावर संकट ओढवले आहे. पेरणीपासून लेकराप्रमाणे जपलेले आणि काढणीच्या उंबरठ्यावर आलेले सोयाबीन पीक पाण्याअभावी करपून गेल्याचे चित्र शिवारात दिसून येत आहे. त्यामुळे उत्पादन हातातून जाण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला असून, अनेक ठिकाणी सोयाबीनची झाडे सुकून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला बियाणे, खत, औषध फवारणी, मशागत व मजुरीचा खर्चही वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हातातोंडाशी आलेले पीक पावसाअभावी करपल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
या पार्श्वभूमीवर रिसोड-मालेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित सुभाषराव झनक यांनी तिवळी शिवारातील शेतकऱ्यांच्या बांधावर थेट जाऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली. त्यांनी शेतातील प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी पावसाअभावी झालेल्या नुकसानीची माहिती देत शासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी मागणी केली.
“शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील वेदना आणि शेतातील करपलेले पीक ही परिस्थिती प्रत्यक्ष पाहिली आहे. केवळ आश्वासन देऊन थांबणार नाही. शेतकऱ्यांची वस्तुस्थिती शासनाच्या दरबारापर्यंत पोहोचवून नुकसानभरपाई व आवश्यक मदतीसाठी ठामपणे आवाज उठवू,” असा विश्वास आमदार अमित झनक यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला.
तसेच संबंधित यंत्रणेकडून पीक नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार मदत मिळावी, यासाठी पाठपुरावा करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. पावसाअभावी नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या अडचणी प्रशासनाने गांभीर्याने घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
तिवळी शिवारातील करपलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करताना आमदार अमित झनक यांच्यासह शेतकरी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने