Ad Code

वाशिममध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी; भव्य रॅली, संविधान वाटप व सामाजिक उपक्रमांनी गाजला कार्यक्रम

प्रतिनिधी :वाशीम 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त वाशिम शहरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. शहरात सकाळपासूनच अभिवादन, रॅली, सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला वाशिम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. योगेश कुंभेजकर, नगराध्यक्ष अनिलजी केंदळे, जिल्हा कार्यकारी अधिकारी मा. अर्पितजी चव्हाण, उपजिल्हाधिकारी घुगे साहेब, तहसीलदार निलेश पळसकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. तसेच जगदीश मानवतकर, दौलतराव हिवराळे, राहुल तुपसांडे, प्रा. महादेव आवारे, पत्रकार राम धनगर, पत्रकार निलेश सोमानी, आकाशवाणी प्रतिनिधी सुनील कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन तेजराव वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते संविधानाच्या प्रतींचे वाटप करण्यात आले. गरजू महिलांना साड्यांचे वितरण करण्यात आले असून, सर्वसामान्य नागरिकांसाठी अल्पोपहाराचीही व्यवस्था करण्यात आली होती.

शहरातून भव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत युवक, महिला, विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “जय भीम”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. अनेकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी जिल्हाधिकारी मा. योगेश कुंभेजकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार केवळ वाचण्यापुरते नसून ते आचरणात आणणे हीच खरी त्यांना अभिवादन करण्याची पद्धत आहे.” त्यांनी समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा समाजात प्रसार करण्याचे आवाहनही केले.

या जयंतीनिमित्त शहरात सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. विविध सामाजिक संघटनांनी रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, तसेच शैक्षणिक जनजागृती कार्यक्रमही राबवले.

विशेष म्हणजे, या कार्यक्रमातून सामाजिक ऐक्य, समता आणि संविधानिक मूल्यांचा संदेश प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचला. १४ एप्रिल हा दिवस खऱ्या अर्थाने समतेचा उत्सव म्हणून साजरा होत असल्याचे चित्र वाशिममध्ये पाहायला मिळाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या