Advertisement

आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी सकल मातंग समाज आक्रमक; मेगाभरती थांबवण्याची मागणी.

 

अहिल्यानगर : अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ सकल मातंग समाजाच्या वतीने राज्यभर जनसंपर्क मोहीम सुरू करण्यात आली आहे. उपवर्गीकरणाची तातडीने अंमलबजावणी करावी आणि तोपर्यंत राज्यात कोणतीही मेगाभरती करू नये, अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने 9 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या निर्णयाची महाराष्ट्र शासनाने तातडीने अंमलबजावणी करून अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण लागू करावे, ही या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. उपवर्गीकरण लागू होईपर्यंत राज्यातील मेगाभरती थांबवावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभरात जनसंपर्क मोहीम सुरू असून राहाता, संगमनेर, नेवासा, श्रीरामपूर, कोपरगाव, राहुरी आणि नगर तालुक्यांत बैठका तसेच गावोगावी भेटी घेण्यात येत आहेत. या मोहिमेला युवक, महिला आणि कार्यकर्त्यांचा प्रतिसाद मिळत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
आमदार अमित गोरखे, आमदार सुनील कांबळे, माजी आमदार रमेश बागवे, सचिन साठे, राजेश घोंडे, सुकुमार कांबळे, अजिंक्य चांदणे, कैलास खंदारे, परिमल कांबरे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
महापुरुषांचा व समाजबांधवांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही आंदोलनातून करण्यात येणार आहे. राज्यभरातून मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने